सोमवार, १४ मे, २०१८

ग्रामीणांचे लग्नसोहळे
- डॉ. सुधीर रा. देवरे

     आधी ‍तीन दिवसांचा लग्न समारंभ व्हायचा. तो आज दोन दिवसांवर आला. लग्नाची तारीख धरली की आधी सर्व भाऊबंद बस्त्याचा दिवस नक्की करायचे. भाऊबंदांना गोळा करून तालुक्याच्या गावी मोठ्या कापडाच्या दुकानात बस्त्याला जायचं. बस्ता म्हणजे नवरा नवरीसाठी घेतले जाणारे नवे कपडे. या बस्त्यात पहिल्यांदा फडकी नावाचं कापड खरेदी करायची परंपरा होती. ती आता नामशेष झाली आहे. बाकी बस्त्यात वराला दोन पोषाखांचे कापड, नवरीला पाच साड्या, परकर, झंपरचे कापड, वरमायांसाठी लुगडे, सुख्यासाठी कापड, टॉवेल, उपरणे – टोप्या आदी कापडे बस्त्यात असायचे.
     पूर्वी गावात तीन दिवसांचे लग्न असायचे. पहिला दिवस मांडवचा. दुसरा टाळीचा- म्हणजे लग्नाचा तर तिसरा दिवस हा मांडवफळ आणि सत्यनारायणचा असायचा. लग्न आठ दिवस पुढे असायचे तेव्हापासून लगीनघराच्या ओट्यावर लोकगीतं गायले जायचे. लग्नातही मोठ्या प्रमाणात लोकगीतांचा समावेश होता. लग्न विधींच्या निमित्ताने अनेक लोकगीतांचा जन्म झाला होता. ही लोकगीतेही आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लोकगीतांची जागा आता आधुनिक गाण्यांसह वाद्यांनी घेतली.   
     लग्नाच्या तिसर्‍या दिवसांच्या लोकपरंपरा खूप मजेशीर होत्या. नवरा नवरी तोंड धुवायला गावाच्या बाहेर नदीत वा पाटावर वाजत गाजत बैलगाड्यातून जात असत. मांडोफळ, नवरानवरीची सार्वजनिक अंघोळ, काकण सोडणं, घरोघर चहापाणी आदी प्रथांचा वराकडील लग्नाचा हा तिसरा दिवस असायचा. आता तो फक्‍त सत्यनारायणापुरता उरला. बाकी परंपरा कालबाहय झाल्या आहेत.
     तीन दिवसाचे लग्न आता दोन दिवसावर आले. पहिला दिवस मांडवचा आणि दुसरा विवाहाचा. ग्रामीण भागात विवाह सोहळे अगदी कालपरवापर्यंत आपापल्या अंगणातच होत असत. नंतर काही विवाह शाळेच्या पटांगणात होऊ लागलीत. विवाहाच्या जेवणात वरण, भात, घुगरी आणि शिरा नंतर शिराला पर्याय म्हणून बुंदी असे मोजकेच पदार्थ असत.
     आता मंगल कार्यालयांच्या काळात विवाह ग्लोबल व्हायला लागलीत. जेवणावळीतल्या पात्रात अन्न मावणार नाही इतके पदार्थ ठेऊन अन्न मोठ्या प्रमाणात वाया घालवलं जातं. हा समारंभ खरं तर लवकर एका दिवसावर यायला हवा. पण तो एका दिवसावर न येता दिवसेंदिवस प्रतिष्ठित होताना दिसतो. पहिल्या दिवसाच्या मांडवच्या कार्यक्रमात देवांचे लग्न लावणे आणि हळद लावणे हे मुख्य कार्यक्रम असून सायखेडं, वरमायांचे पाय धुणे, तेलन पाडणे आदी अन्य विधी आहेत. वधूचे घर असेल तर वधूला वा वराचे घर असेल तर वराला हळद लावण्याचा कार्यक्रम आता थाटामाटात आणि वाद्यांच्या गजरात होत असतो. पूर्वी हळद लावणे हा विधी केवळ घरगुती कार्यक्रम असायचा. आता हा कार्यक्रम दिवसेंदिवस कमर्शियल होत महत्वाचा समजला जाऊ लागला.
     मांडवच्या एका बेळीजवळ माठणी ठेऊन तिथे आरबोर ठेवणे हा विधी आहे. मांडवला कच्च्या धाग्याच्या दोराने गुंडाळणे हा एक विधी आहे. हळद फोडणे, तेलन पाडणे आदी वि‍धीही आज केले जातात. देवांचे लग्न लावणे हा मांडवच्या दिवसाचा मुख्य वि‍धी. वरमायांचे पाय धुणे ही लोकपरंपराही कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. थोडक्यात, लग्न घरातून आता लोकगीतं ऐकू येत नाहीत. लग्नातले लोकगीतं म्हणणे दिवसेंदिवस कमी होत चालले. मानपानाची प्रथाही कमी होताना दिसत असली तरी लग्न समारंभांना येणारे व्यावसायिक रूप आणि दिखाऊपणा कमी होताना दिसत नाही. कार्यक्रमांना आपल्याला गर्दी हवी असते. मग तो लग्नसमारंभ का असेना. अशी मानसिकता कार्यरत असेपर्यंत लग्नसमारंभ खर्चिकच होत राहतील.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १ मे, २०१८

ग्रामीण करमणूक-मनोरंजन- डॉ. सुधीर रा. देवरे

          उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर  गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत. दिवसभर अंग दुखेपर्यंत कष्ट केल्यानंतर वेळ उरला की ग्रामीण लोक आपल्या मनोरंजनाकडेही वळत.
          भोवाडा, डोंबार्‍याचा खेळ, गारूडीचा खेळ, तमाशा, सर्कस, गावातल्या लोकांनीच बसवलेले नाटक, गणपतीच्या काळात गावात मागवलेले एखादे कलापथक वा ऑक्रेस्ट्रा, भारूड, कीर्तन, प्रवचन, भजन, लळित, खंडोबाचं आढीजागरण, होळी, आखाजीचा बार, झोके, पतंग, गौराई, कानबाई, रानबाई, भालदेव, जादूगार, टिंगरीवाला, रायरंग, बाजार, जत्रा, अनेक मैदानी खेळ, विहिरीत वा बंधार्‍यात पोहणे आदीत मन घालून ग्रामीण लोक मनसोक्‍त जीवन जगत. लोकजीवनातून पारंपरिक पध्दतीने गावकरी देव भजत असत. देव भजण्यातून विधी केल्या जात. आणि या सर्व प्रक्रियेतून अनायासे गावकरी आपले मनोरंजनही करून घेत असत.
          आखाजीच्या बारात ऐकू येणार्‍या अश्लील गाळ्या कोणत्याही गावकर्‍याला त्या काळात अश्लील वाटत नव्हत्या. (शहरात या शिव्यांना अश्लील समजलं जायचं.) आता अलीकडच्या काळात त्या गाळ्या (शिव्या) ग्रामीण लोकांनाही अश्लील वाटू लागल्या. आखाजीच्या दिवशी दिवस कलला की गावातले लोक हटकून वेळ काढून बार खेळण्याच्या जागेवर जाऊन बसत. हातात दगडी घेऊन गोफणीने वा हातानेच दुसर्‍या गावातल्या तरूणांवर धाऊन जात दगडी मारत. एक तर दुसर्‍या गावातल्या माणसाचं तो डोकं फोडत असे वा आपलं डोकं फोडून घरी परतत असे. काही लोक बारची फक्‍त दुरून गंमत पहात असत. आज मात्र या गावकर्‍याला ते प्रतिष्ठितपणाचं वाटत नाही. (बारात डोकी फोडणं हे त्याकाळीही चुकीचंच होतं.) शेतीची वा नेहमीची कामे करत गाववासी दोन मसाल्यांवर चालणार्‍या रेडिओवरची गाणीही ऐकत असे.  
          कबड्डी,‍ चिलापाटी, आट्यापाट्या, पावसाळ्यात ओल्या जमिनीत जोरात सळई खुपसणे, भोवरा, भोवर्‍यातली पाच कोची, दगड का माती, लपाछपी, डीबडीब, हत्तीची सोंड, गो गो राणी, खोपाखोपी, कुस्त्या, कोयी कोयी, गोट्या गोट्या, आळे चिपी, आंधळी कोशींबीर, आळीसुळी अशा प्रकारच्या अनेक मैदानी खेळात ग्रामीण तरूण आपली करमणूक करून घेत असत. 
          वर सांगितलेल्या करमणूक- मनोरंजनाऐवजी आज खेड्या पाड्यातले लोक टीव्हीवर सिरियल पाहतात, मुव्हीज् पाहतात, क्रिकेट मॅच पाहतात, आयपीएल पाहतात. आज प्रत्येकाच्या हातात आलेला मोबाईलसुध्दा एक करमणुकीचे मुख्य साधन झाला आहे. ज्यांच्या घरी कधी टेबलावर ठेवण्याचा लँडलाईन फोन आला नाही, अशा घरातही आज प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहेत.
          मोबाइलवर गेम खेळणे, व्हीडीओ पाहणे, ‍व्हीडीओ चॅट करणे, व्हॉटस अप मेसेज फॉरवर्ड करत राहणे, गाणे ऐकणे, सेल्फी घेणे, फोटो काढणे आदी प्रकारचा टाइमपास मोबाईलवर केला जातो.
     होळीच्या अश्लील आरोळ्या मारायला आज गावातला माणूस सरमायला लागला. भोवाडा तर आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तमाशा आज चोरून लपून पाहण्याच्या पंगतीत जाऊन बसला. अशा प्रकारच्या लोकपरंपरा आजच्या पिढीला भावत नाहीत. झोक्यावर बसणं आज कोणाला आवडत नाही. झोक्यावर बसून झोक्यावरची गाणी म्हणणं तर फार लांबची गोष्ट झाली. रेडिओवरच्या बातम्या वा जुनी गाणी ऐकणंही आज कालबाह्य झालं आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

उन्माद-   डॉ. सुधीर रा. देवरे

     देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अ‍सहिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!
     जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्‍घोषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?   
     राजकारणातून नक्की कोणतं समाजकारण केलं जातं? राजकारण हे सामाजिक कामाचं व्रत आहे का? राजकारणाचा समाजकारणाशी संबंध तरी उरला काय? राजकारणाला प्रचंड व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी? जात- धर्म धोक्यात आल्याच्या घोषणा देणारे लोक आपलं माणूसपण कुठं गहान ठेवतात! मानव असण्यापेक्षा विशिष्ट जाती-धर्माचं असणं अस्मितादर्शक ठरू शकतं का?
     घरांपासून चालत्या वाहनांपर्यंत दिसणार्‍या रंगीबेरंगी झेंड्यांत अशोकचक्राचा तिरंगी कुठं आहे? (‍वर्षांतून दोन वेळा सरकारी कार्यालयांवर वाजत गाजत फडकवण्यासाठी राखीव ठेवण्यात आला का?) व्होटबँक वाढते म्हणून दिवसाढवळ्या भर रस्त्यांवर निर्लज्जपणे माणूस मारण्याचे थेट प्रयोग सुरू आहेत!
     देशातला मतदार म्हणून नव्हे, देशाचे नागरिक म्हणून... लोकहो जागे व्हाल? लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! तुमच्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/