शनिवार, १९ जानेवारी, २०१३

सत्ताहीन पाकिस्तान



-         डॉ. सुधीर रा. देवरे

      पाकिस्तान हा सत्ताहीन देश आहे. त्या देशाचे पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन तेथील सुप्रीम कोर्टाने त्यांना अटक करायचे फर्मान काढल्यामुळे ते भूमिगत झालेत म्हणून वा त्या देशातील राष्ट्रपती असिफ अली झरतारींना दुबईला पळून जावे लागले म्हणून आज तो देश सत्ताहीन झाला, असे मला म्हणायचे नाही. पाकिस्तान हा देश त्याच्या निर्मितीपासून म्हणजेच 1947 पासून सत्ताहीन देश आहे. पाकिस्तानात सुरूवातीपासूनच पाच सत्ताकेंद्रे आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, आयएसआय, लष्कर आणि दहशतवादी हे ते पाच सत्ताकेंद्रे आहेत. यापैकी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा एक ग्रुप तर आयएसआय, लष्कर आणि दहशतवादी हा दुसरा ग्रुप.
      पाकिस्तानच्या लोकशाही मुखवट्यासाठी तेथे सार्वजनिक निवडणुका होऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या नावाने नकली सरकार अस्तित्वात येते. हे सरकार दुसर्‍या ग्रुप कडून कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवले जाते. या सरकारला तसा काहीही अर्थ नसतो. म्हणूनच पाकिस्तान लोकनियुक्त सरकार अमेरिकेकडून करोडो रूपयांची मदत घेऊनही ओसामा बिन लादेनला तेथील लष्कर लपवून ठेवते आणि सरकारला हे माहीत असूनही ते खपवून घेते.
      हा तिढा अमेरिकेला माहीत असूनही अमेरिका डोळेझाक यासाठी करते की लोकनियुक्त सरकारच्या नावाने अमेरिकेला आशिया खंडात हा हक्काचा तळ उलब्ध होतो. दहशतवाद्यांवर उघड आणि राजरोस द्रोन हल्ले करता येतात. ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तान सरकारला अंधारात ठेऊन सहज ठार मारता येते. म्हणून अमेरिका पाकिस्तानशी राजनैतिक संबंध ठेवते. अमेरिकेसारखे आपल्याला म्हणजे भारताला तसे करता येणार नाही. पाकिस्तानातील पाकव्याप्त काश्मिरातील दहशवादी आपल्याला विमानाने टिपता येणार नाहीत. दाऊदला नाहीतर अन्य दहशतवाद्याला तिथून उचलून आणता येणार नाही. मग अमेरिकेचे अनुकरण करत भारत पाकिस्तानाशी राजनैतिक संबंध ठेऊन काय साध्य करतो.
      उलट या राजनैतिक संबधांमुळेच आपण आहोत त्यापेक्षा अधिक संकटे ओढवून घेत असतो. अटल बिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला जाताच तिथल्या लष्कराने कारगिल बळकावले. आताही आपण पाकिस्तानशी मैत्रीचा राग आळवताच तिथल्या लष्कराने कपटाने आपले जवान मारून त्यांची विटंबना केली. ज्या ज्या वेळी पाकिस्तानच्या नकली सरकारशी आपण जवळीक केली त्या त्या वेळी तिथल्या लष्कराने आपल्याशी घातपात केले आहेत. त्यापेक्षा या नकली सरकारशी दूर राहिलेले चांगले. युध्द नको आणि मैत्रीही नको. पाकिस्तानला सुरक्षित अंतर राखून दूर ठेवावे आणि ज्या ज्या वेळी त्याने आगळाई केली त्या त्या वेळी त्या आघाडीवर चोख प्रत्युत्तर देणे हितावह ठरेल.
      केवळ भारत द्वेशातून या देशाची निर्मिती झाल्यामुळे ‍तेथील ‍दुसरा ग्रुप आपल्याला जवळ येऊ देणार नाही. काही काळ हा देश मुस्लीम देशांचे नेतृत्व करण्याच्या गप्पा करत होता. मुस्लीम बाँब ची हाकाटी देत होता. पण त्यांचे धोरणे आणि वागणे मुस्लीम धर्माच्या विरूध्द आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय मुस्लीम देशांनीही पाकिस्तानाला वाळीत टाकायला हवे.
      आता राहिला प्रश्न पाकिस्तानी जनतेचा. आतापर्यंत पाकिस्तानी जनतेने सार्वजनिक रित्या भारताच्या बाजूने विचार मांडलेले नाहीत. इम्राणखान सारखे आजचे नेतेही भारतात येऊन भारताचा पाहुणचार घेऊन जातात पण भारत हा आपला मित्र देश आहे हे पाकिस्तानात जाऊन सांगण्याची त्याची हिम्मत होत नाही. पाकिस्तानचे कलाकार, गायक, खेळाडू आणि विचारवंत भारताच्या बाजूने उभे राहत नाहीत हे दुर्दैव. आणि म्हणूनच  त्यांना‍ विरोध करावा लागतो. भारतासारखी वैचारिकता, पत्रकारिता, तटस्थता तिथल्या जनतेत नाही हे सत्य आहे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा