गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

माझ्या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण




-         डॉ. सुधीर रा. देवरे

          
         बरोबर तीन वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष  एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र गेल्या वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत आलो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या वर्षातही एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळतोय. 
         या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, भाषा, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. तीनही वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.
         या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतोय. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केलाय. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास तीन हजार वाचक वाचतात असा माझा अंदाज आहे. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतोय. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.
         तीन वर्षातील या छोट्या लेखांची अचूक संख्याच सांगायची झाली तर ती 140 (एकशेचाळीस) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लेखनही ब्लॉग मधून देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व 140 लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

      

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

घुमान साहित्य संमेलन


-         डॉ. सुधीर रा. देवरे


साहित्य संमेलन असले की अनेक मित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? नाही सांगितले तर का नाही जाणार? का नव्हते गेले? साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटत असते. साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जातेय की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज अलिकडे दृढ होत चाललाय असे दिसते. असो.
प्रत्येक वर्षांप्रमाणे आताचे 88 वे घुमान साहित्य संमेलन सुध्दा यशश्वी संपन्न झाले. साहित्य संमेलनात अखिल भारतीय हे भारदस्त शब्द असल्यामुळे अधून मधून महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलन भरवणे आता अगदी अगत्याचे आणि अपरिहार्य होऊन बसले असावे. जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा महाराष्ट्राबाहेरच्या शहरांतही आतापर्यंत अ. भा. साहित्य संमेलने भरवली गेलीत. उदा. ग्वाल्हेर, बडोदा, इंदोर, बेळगाव आदी ठिकाणी संमेलने झालेली आहेत आणि या शहरांत प्रचंड मोठ्या लोकसंखेच्या प्रमाणात मराठी माणूस वास्तव्याला आहे.
      मात्र या सर्वांत घुमान साहित्य संमेलन वेगळे ठरणार होते- वेगळे ठरले आहे. घुमानला मराठी माणसं जवळ जवळ नाहीतच. तरीही संत नामदेवांच्या उत्तरायुष्यातील कर्मभूमीत आणि निवासभूमीत हे संमेलन भरले. पंजाब सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्‍त विद्यमाने भरवलेले हे संमेलन होते असे म्हटले तरी चालेल. या वाक्याकडे टीका म्हणून कोणी पाहू नये. पंजाबसारख्या एकदम भिन्न भाषिक राज्यात मराठी साहित्य संमेलन भरवणे कौतुकास्पद असले तरी आणि भाषा जोडो या अर्थाने दोन भाषा जोडण्यासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहणे सयुक्‍तीक असले तरी संपूर्ण मराठी श्रोता महाराष्ट्रातून रेल्वेने तिथे घेऊन जाणे कितपत सयुक्‍तीक होते, हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. म्हणून टीव्ही चॅनल्सवर लाइव आणि नंतर प्रसारित होणारे वृत्तांत पहात असताना एक गोष्ट लगेच प्रकर्षाने लक्षात येत होती ती ही की व्यासपीठाशिवाय टीव्ही कॅमेरे इकडे तिकडे वा श्रोत्यांकडे अजिबात सरकत नव्हते. म्हणजे समोर श्रोते किती होते आणि कोण कोण होते हे कळायला नको याची खबरदारी घेतली जात होती की काय? अध्यक्षिय भाषणावेळी एकदाही उपस्थितांवरून कॅमेरा फिरला नाही.
      संपूर्णपणे राजकीय व्यासपीठ असलेल्या या मंचावर एकुलते एक मराठी साहित्यिक की जे या संमेलनाचे अध्यक्ष सुध्दा होते ते सदानंद मोरे अवघडल्यासारखे वा एकदम उपर्‍यासारखे एकटे वाटत होते. राजकीय लोकांच्या वेळेला किंमत देऊन आणि त्यांचा वेळ आपण आपल्या अध्यक्षिय भाषणात वाया घालवू नये याची जाणीव ठेऊन अध्यक्ष आपले भाषण वेगवान शैलीत उरकताना दिसत होते. प्रत्येक चार पाच वाक्यांनंतर ते आपल्या मनगटावरचे घड्याळ पहात होते. अध्यक्ष असे घड्याळ पाहून भाषण करतात म्हणून राजकीय नेत्यांना हमखास खात्री पटली की आपला जास्त वेळ आता वाया जाणार नाही. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षिय भाषणात काहीतरी वेगळे आणि मराठी साहित्याला पुढे घेऊन जाणारे मुद्दे असतील असे वाटत होते. पण त्यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाला. राजकीय इतिहासात आणि संत परंपरेत ते रमले आणि त्यातूनही भरीव असे काहीच मिळाले नाही.
      बाकी काही असो. साहित्य संमेलनाकडे एक वारी म्हणून पाहणार्‍यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्‍यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कुठल्यातरी मंचावर हजेरी लावणार्‍यांसाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणी नक्कीच होती आणि ती पर्वणी त्यांनी खूप मजेत साजरी केलेली दिसली. फक्‍त परतीच्या प्रवासात दुपारचे जेवण उशीरा मिळाले एवढीच काय त्यांची गैरसोय झाली असावी. (तीन दिवसाच्या साहित्य संमेलनातील जेवणावर एक्काहत्तर लाख रूपये खर्च होणार असल्याचे संमेलनाआधी वाचले होते. म्हणजे एवढी रक्कम जेवणावळीला लागू शकते असे मराठी माणसाने पंजाबी अधिकार्‍यांना सांगितले होते. चूकभूल देणे घेणे.)
      नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे साहित्य संमेलन सुरू झाले की सडकून टीका करायची असे ज्यांचे उद्योग आहेत त्यांनी या संमेलनावरही भरपूर टीका केलीच. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एक थोर लेखक एकीकडे घुमान साहित्य संमेलनाला आयुष्यातून पहिल्यांदाच लेखी शुभेच्‍छा पाठवतात तर त्याच वेळेचा मुहुर्त साधून एका चिल्लर मंडळाचा चिल्लर पुरस्कार स्वीकारताना साहित्य संमेलनावर टीकाही करतात. (अशी टीका करता करता यापुढे अध्यक्षपद चालून आलेच तर तेही ते स्वीकारतील.) अ. भा. साहित्य संमेलन हे त्यांच्या म्हणण्यानुसार जर एक उत्सव असेल तर आपल्या फालतू हौशी प्रसिध्दीसाठी पुरस्कार वितरण करणार्‍या एका संस्थेच्या इतक्या क्षुल्लक कार्यक्रमाला त्यांनी का उपस्थित रहावे हा कोणालाही प्रश्न पडावा. हे मराठी साहित्य संमेलन निदान नावाने तरी अखिल भारतीय होते पण हे थोर लेखक ज्या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार घेत संमेलनावर टीका करीत होते ते पुरस्कार मोजक्या तालुक्यांतल्या लोकांना वाटले जातात. हे पुरस्कार जिल्हास्तरीय सुध्दा नसतात. असे अनेक विरोधाभास काही साहित्यिकांच्या वागण्या- बोलण्यातून दिसून येतात. पण त्याला आपला इलाज नाही.
      मराठी माणूस उत्सव प्रिय आहे. फोटो प्रिय आहे. प्रसिध्दीप्रिय आहे. फेसबुक प्रियही आहे आता. म्हणून काही साहित्यिकांनी संमेलनाच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड केले आहेत. अशाच पध्दतीने यापुढेही मराठी माणूस संमेलने भरवत राहील. त्याच त्याच कविता म्हणत तेच तेच कवी प्रत्येक कवी संमेलने गाजवत राहतील. परिसंवादातही तेच तेच आलटून पालटून आलेले लोक आणि शब्दांचा खेळ करत वर वर बदललेले तेच विषय चघळले जातील. याच वेळी मराठी भाषेत लिहिणारे काही मोजके साहित्यिक आपल्याला घरात कोंडून घेत- समाधी घेत कोपर्‍यात आयुष्यभर लिहीत रहातील. त्यांचे साहित्य कोणी प्रकाशित करो वा न करो. आणि जिथे तिथे व्यासपीठांवरून नुसते बोलणारे वक्‍ते यापुढेही कायम बोलत रहातील. मग ते व्यासपीठ कोणते का असेना. बोलायला फक्‍त व्यासपीठ हवे. संमेलनात आपल्याला निमंत्रण मिळाल्याशी मतलब. आणि नाही मिळाले तरीही आम्हाला अडवणार कोण? आम्ही स्वयंभू.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

बुधवार, १ एप्रिल, २०१५

पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       माणूस जेव्हा देव होतो ह्या नावाचा माझा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. (ज्याच्या प्रकाशन समारंभाला मात्र मी स्वत:च उपस्थित नव्हतो.) या आधीची माझी प्रकाशित असलेली सर्व नऊ पुस्तके महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. ग्रंथाली, पद्मगंधा, शब्दालय, भाषा अशी ही प्रकाशने आहेत. मात्र माणूस जेव्हा देव होतो हे पुस्तक प्रकाशकांकडे पाठवले तर त्यांनी पुस्तक प्रकाशित करायला असमर्थता दाखवली. एका स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हे पुस्तक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ते कोण वाचेल, म्हणजेच ते कसे विकले जाईल हा प्रकाशकांपुढे व्यावसायिक प्रश्न होता. (खरे तर हे पुस्तक प्रातिनिधीक देवत्वाचे चिंतन करणारे आहे. लोकधाटी, लोकश्रध्दा, लोकजीवन समजून घेत संशोधनात्मक साधने वापरली असल्याने हा ग्रंथ केवळ स्थानिक म्हणता येणार नाही.)
         हा ग्रंथ स्थानिक एका वीरगळाच्या निमित्ताने लिहिला असल्यामुळे याला माझे नेहमीचे प्रकाशक लाभणार नाहीत हे नक्की होताच यातून मार्ग काढण्यासाठी कोणी प्रायोजक शोधावा का, असे मनात आले. लोकजीवनातील लोकश्रध्दा उपयोजित होत संशोधनाच्या वाटेने जाणारा व वैश्वीक देवत्वाचा विचार मांडणारा हा ग्रंथ प्रकाशित व्हायला हवा, असे मला वाटत होते. म्हणून प्रकाशनासाठी काय करावे हा मला प्रश्न पडला होता.
         मनात विचार आला की स्थानिक वीरगळाच्या एखाद्या भक्‍ताकडे पुस्तक प्रकाशित करण्याची विचारणा करावी का? म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी स्वत: पैसा खर्च करावा. बदल्यात पुस्तकाच्या शेवटी त्यांचा प्रायोजक म्हणून अल्प परिचय आणि फोटो छापावा. या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी परस्पर खर्च केला असा परिचयात स्पष्ट उल्लेख करावा. कल्पना माझीच मला छान वाटली. पण कोणाला विचारायला संकोच वाटत होता. आजपर्यंत कोणाकडे काहीच मागितले नाही आणि आता एकदम पुस्तक प्रकाशनाची गळ कशी घालायची? मनातल्यामनात साधकबाधक विचार करून ज्या स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हा ग्रंथ लिहिला त्या देव मामलेदारांच्या एका भक्‍ताला घरी बोलवून माझी ही संकल्पना त्यांना सांगितली. त्यांना हे ही स्पष्ट सांगितले की, हा ग्रंथ म्हणजे पोथी नसून देवाच्या मीमांसेचा वैचारिक ग्रंथ आहे. म्हणजे काही गोष्टींवर टीका आहे. योगायोगाने माझे म्हणणे पहिल्याच भक्‍ताने मान्य केल्यामुळे मला इतर भक्‍तांकडे तसा शब्द टाकण्याची पुन्हा वेळ आली नाही. (त्यांनी नाही म्हटले असते तर दुसर्‍या भक्‍ताला तसे सांगण्याची माझी कधी हिम्मतही झाली नसती.)
         मात्र ग्रंथ प्रकाशनासाठी मला काही तडजोडी कराव्या लागल्यात. उदाहरणार्थ, पुस्तकाचा मुद्रक हा प्रायोजक भक्‍ताने स्वत: शोधल्यामुळे माझ्या मनातल्या ग्रंथाची संकल्पना मला सोडून द्यावी लागली. पुस्तक सर्वसामान्य पुस्तकाच्या आकाराऐवजी दिवाळी अंकाच्या आकारात छापले गेले. छपाई करणारे लोक सराईत नसल्याने प्रुफ तपासणी मला स्वत:ला पाच वेळा करावी लागली, तेव्हा कुठे पुस्तकातल्या चुका कमी झाल्या. पुस्तक छपाईला खर्च करणार म्हणून प्रायोजकाचा फोटो आणि परिचय पुस्तकामागे मी देणार होतोच. तो दिला. पण त्या खर्चासाठी प्रायोजकांनी स्वत: काही जाहिराती परस्पर गोळा केल्या आणि नंतर (तीन वेळा प्रुफ तपासणी झाल्यावर) मला तसे सांगितले. जाहिराती छापण्यासाठी (मुद्रणाची प्रक्रिया पुढे गेल्यामुळे) मला नाइलाजाने होकार द्यावा लागला. पुस्तक प्रकाशनाची चर्चा करताना पुस्तकात अशा जाहिरातींच्या समावेशाचा प्रायोजकांनी माझ्याजवळ उल्लेख केला नव्हता. आणि मी ही जाहिरातींचा विचार केला नव्हता. यातल्या यात मला एकच समाधान मिळाले की पुस्तकात जाहिराती छापल्या तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे त्या सर्व जाहिराती पुस्तकाच्या शेवटी छापल्यात. पुस्तकाच्या सुरूवातीला आणि मध्यभागी जाहिराती छापण्याचा प्रयत्न झाला, पण मी तसे होऊ दिले नाही.
         इतके सारे होऊनही (माझ्या मते पुस्तक प्रातिनिधीक असले तरी) मला स्थानिक पातळीवरचे पुस्तक प्रकाशित करता आले याचे मी समाधान मिळवू पाहतो. कारण अशा तडजोडी केल्या नसत्या तर हे पुस्तक प्रकाशनाअभावी घरात पडून राहिले असते. अशा पध्दतीने मी माझ्या एका पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग यशश्वी केला का? खरे तर हे पुस्तक माझ्या प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे स्थानिक पातळीवरचे आहे असे मी मानायला तयार नाही. एका ‍वीरगळाच्या निमित्ताने असले तरी महाराष्ट्रभर वा जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा वैश्वीक जगात हे पुस्तक उपरे ठरणार नाही असे मला वाटते. कारण या वीरगळाच्या निमित्ताने लिहिलेला हा समग्र वैश्वीक देवत्वाचा ग्रंथ आहे. स्थानिक पातळीवरील फक्‍त एका देवाचा नाही. हा ग्रंथ फक्‍त आस्तिकासाठी नाही, तर नास्तिकासाठीही आहे. या ग्रंथात विचार आहेत. पुराण नाही. यासाठी दंतकथांचा शेंदूर, चमत्कार मीमांसा, देव आणि माणूस, तेहतीस कोटी देव आदी प्रकरणे वाचलीत तरी पुस्तकाच्या वैचारिक व संशोधनात्मक अधिष्ठानाचा प्रत्यय येईल.
         आज सगळ्याच प्रकाशकांकडे छापण्यासाठी पुस्तकांची प्रचंड रांग लागलेली असते. म्हणून अनेक चांगली पुस्तके पाच पाच वर्ष प्रकाशकांकडे नुसती पडून असतात. या पार्श्वभूमीवर पुस्तक प्रकाशनासाठी असे प्रायोजक शोधावेत का? प्रकाशनासाठी पुस्तकाच्या मागे अशा जाहिराती छापून दर्जेदार पुस्तके उजेडात आणण्याचे प्रयोग करावेत का? असे काही प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. प्रायोजकांनी पुस्तके प्रकाशित केलीत तर पुस्तकाच्या किमतीही आटोक्यात येऊ शकतील आणि सामान्य माणसापर्यंत पुस्तक पोचेल. या प्रयोगावर सखोल चर्चा व्हावी. 
       (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे   
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/