मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

चिलापाटीचा खेळ





- डॉ. सुधीर रा. देवरे

            चिलापाटी नावाचा एक खेळ असतो. आम्ही तो लहानपणी खेळायचो. हा खेळ कबड्डीसारखाच परंतु थोडा वेगळा असतो. दोन्ही बाजूला दोन पाट्या आणि दोन्हींच्या मध्ये पाट्यांना जोडेल शी एक पाटी. या पाट्या म्हणजे जमिनीवर तात्पुरत्या तयार केलेल्या रेषा. या रेषा तळपायाने ओढत आखल्या जातात वा एखाद्या काठीने जमिनीवर ओरखडल्या जातात. अशा पध्दतीने चिलापाटी खेळाच्या पाट्या पाडाव्या लागतात. चिलापाटीच्या पाट्यांचा आकार इंग्रजी आय ह्या अक्षरासारखा असतो. रेषा कायमस्वरूपीच हव्यात असे नाही.
            या खेळासाठी कबड्डीसारखे दोन्ही गटांमध्ये अकराच खेळाडू हवेत असेही नाही. चिलापाटीत यापेक्षा कमी खेळाडू असले तरी चालत. पण दोन्ही गटात सारखेच खेळाडू हवेत. चिलापाटीच्या खेळात दोन्ही गटात किमान तीन-तीन खेळाडू असलतरी खेळता येतं. पण जेवढे जास्त खेळाडू तेवढा खेळ जास्त रंगतो.
            अगोदर कोणी खेळायच हे छा-काटा करून नक्की करावलागत. जे जिंकतात ते  चिलापाटीच्या वरच्या पाटीवर उभे असतात आणि जे छाप काटे हरले त्या गटाला खालच्या पाटीवर उभरहावलागत. खालच्या पाटीवरचा एक खेळाडू वरच्या पाटीवर मधल्या पाटीवरून चालत जातो. वरच्या गटातील एक खेळाडू ह्या खेळाडूशी हाताने टाळी घेतो. ह्या टाळीला चिली घेणे अस म्हणतात. चिली घेताच खेळ सुरू होतो. चिली घ्यायला जो खेळाडू येतो त्याला विरूध्द गटातील गळे खेळाडू सर्व बाजूंनी घेरून हैराण करतात. पाटीवरून ओढून काढायचाही प्रयत्न करतात. ह्या प्रयत्नाना तोंड देत तो खेळाडू हळूहळू मधल्या पाटीवरूनच आपल्या खेळाडूंमध्ये खालच्या पाटीवर पोचतो. तिथे येण्याच्या आधी जर पाटीवरून तो ढकलला गेला म्हणजे त्याचे दोन्ही पाय पाटीवरून बाजूला झाले तर तो आऊट होतो. पण त्या एकट्या खेळाडूने जर विरूध्द गटाच्या पायाला पाय लावले तर तो सर्व गटच औट होतो. अशा पाय लावण्यावेळी बाकीचे खेळाडू त्याचा पाय धरून त्याला बाहेर ओढून घेऊ शकतात. हा एकटा गडी औट करणे तसे सोपे असते.
            मग खाली पाटीवर उभ्या असलेल्या इतर खेळाडूंबरोबरही पुन्हा चिली होते. एकमेकांचे हात हातात घेऊन बळ करून ओढले जातात. पाटीवरचा जर ओढला गेला तर तो खेळाडू औट होतो आणि पाटीवरच्याने जरी एकालाच पाय लावला तरी सर्व गट औट होतो आणि राज बदलतो. जो पर्यंत कोणीच आऊट होत नाही तोपर्यंत हा खेळ सुरूच असतो. सर्व खेळाडू ही खालची पाटी ओलांडून गेले की पुन्हा तीच पाटी उलट्या बाजूने ओलांडायची. असे झाले की पुन्हा नव्याने डाव सुरू होतो.
            जिंकणारा वरच्या पट्टीवर आणि हरणारा खालच्या पट्टीवर असा हा डाव असतो. पाय लावायला पाय लायी दिधा किवा मारी दिधं असे म्हणतात.
            असा असतो हा चिलापाटीचा खेळ. हा खेळ आम्ही लहानपणी मराठी शाळेच्या पटांगणात खेळायचो. राज द्यायचा राहिला तर मी दोन्ही हात पाटीवर ठेऊन लांबपर्यंत पाय फेकून पाय लाऊन देत असे.
      हा खेळ आता कोणी खेळत नाही. मी हा खेळ विसरून गेलो होतो. या खेळाची थोडी थोडी आठवण येत होती, पण एके दिवशी आयुष्याच्या लढाईत या खेळाची आठवण प्रकर्षाने झाली. आयुष्यभर हा खेळ खेळावा लागेल अस मला लहानपणी कधीच वाटल नव्हत. पटांगणातला हा खेळ रोज आयुष्यात कोणी लपून छपून आपल्याशी खेळेल अस मला वाटल नव्हत. लपतछपत खेळणारा खेळाडूच कायम आपल्याला मारून देईल तेव्हा आपण फक्‍त बचाव करायचा प्रयत्न करत जगू असही मला तेव्हा वाटल नव्हत. पाय लावून देणे, चिली देणे, ह्या गोष्टी तर मी विसरून गेलो होतो.
      एकदा गावाकडून एक मित्र आला. त्याच्याजवळ ह्या खेळाचा विषय काढला. आपण असा असा खेळ खेळायचो, असे पाय मारायचो, त्याला आपण काय म्हणायचो? अस विचारल. मित्रालाही आठवत नव्हत. मग हळूहळू आम्हाला एकेक आठवायला लागल. त्यातून तंगड्या धरणं, पाय लायी देणं, चिली घेणं हे शब्द आठवले. आता या लिखाणात पहिल्यांदाते वाक्प्रचार होऊन येऊ पाहतात.
            हे सर्व आज सांगण्याच कारण अस की, पल्याला लहानपणी सर्व काही कळत नाही तेव्हा आपण हा खेळ खेळलो तो ही समोरासमोर, ते पटण्यासारंखं होत. पण आजच्या रोजच्या जीवनात फक्‍त राजकारणीच नाहीत तर बरेच लोक हा खेळ आपसात खेळतात. साहित्यिक, खेळाडू, कलाकार, शेजारी, भाऊबंद, कार्यालयातले सहकारी, अधिकारी हा खेळ आपल्याशी रोज खेळत राहतात. कोणी कोणी हातात हात घेऊन शेक हँडच्या नावाखाली चिली घेतो आणि पाटीवरून आपल्याला ओढून बाजूला सहज फेकून देतो. कोणी हळूच पाठीमागून येऊन तंगड्या धरतो आणि पाटीवरच भिडूसमोर आपल्याला दाणकन आदळून देतो. आपण कायमचे औट होऊन जातो. हे सर्व अनुभव घेत मला चिलापाटीची आठवण आली. आजचे सर्व चाकोरीबध्द रस्ते म्हणजे चिलापाटीच्या पाट्या. आपण ह्या पाट्यांवरून कितीही नाकासमोर चालल तरी आजूबाजूचे भिडू आपल्याला औट करायला टपून बसलेले आहेत. कोण केव्हा पाय लावून देईल आणि कोण केव्हा पाटीवरून ढकलून देईल याचा भरोसा नाही. तरीही माणसावरचा विश्वास आपण उडू देता कामा नये. समोर येईल त्याला नमस्कार करणे आपण विसरायला नको. कारण प्रत्येक माणसावर संशय घेतला तर आपल्याला जगताच येणार नाही. म्हणून आपला धर्म आपल्याजवळ आणि त्याचा धर्म त्याच्याजवळ म्हणत आपण फक्‍त प्रेम वाटत राहू या.         
            (मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या सहज उडत राहिलो या माझ्या आत्मकथनातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

बलात्कारी पुरूषाची आई स्त्रीच असते...





-         डॉ. सुधीर रा. देवरे

(संदर्भ: खैरलांजी बलात्कार, दिल्ली बलात्कार, मुंबई बलात्कार, कोपर्डी बलात्कार, दिल्ली-बँगलोर विनयभंग, जगात रोज होणारे हजारो विनयभंग आणि बलात्कार...)

प्रत्येक पुरूषाचा जन्म एका स्त्री पासून होतो
प्रत्येक पुरूषाची आई ही एक स्त्री असते
कोणत्याही लिंगपिसाट बलात्कारी
पुरूषाची आई सुध्दा एक स्त्रीच असते
म्हणून आईने आपल्या मुलाला
घरात सुचकतेने सांगायला हवं:
:बाळा, मी जशी तुझी आई आहे
घरात जशी तुझी बहिण आहे
तशाच तुला बाहेर भेटतात त्या इतर स्त्रियाही
मनाने- भावनेने- शरीराने माझ्यासारख्याच आहेत
तुला काही आवडतील
काहींचे आकर्षण वाटेल
आणि तसं आकर्षण वाटणं
स्वाभाविक आहे- नैसर्गिक आहे, गैर नाही
काहींशी तू मैत्री करशील
पुढे कुठली तरी स्त्री तुझी पत्नी होईल
स्त्रियांशी मैत्री जरूर कर.. चर्चा कर
वाद घाल लैंगिकतेवरही बोल
पण तुझे विचार तिच्यावर लादू नकोस
कोणावरही कसलीही बळजबरी करू नकोस
(बलात्कार हा शब्द टाळावा
तुम्हाला काय म्हणायचं हे त्याला कळेल.)
एखाद्या स्त्रीने तुझ्या मैत्रीला नकार दिल्याने
तू आतून दुखावून मनात सूडाची भावना ठेऊ नकोस
तुझा दृष्टीकोण कितीही निकोप असला तरी
तिच्या मनातील वादळ वेगळं असू शकतं
तू असं धाडस कधी करणार नाहीस याची मला खात्री आहे
तुझ्या इतर मित्रांनाही अशा धाडसांपासून सावध कर
असा वास येईल तिथं तू मदतीला धाऊन जा
रस्त्यावर अशी असहाय्य स्त्री मदत मागत असेल
वा एखाद्या अपघातात कोणाला इस्पितळात पोचवायचं असेल
तर हातातलं काम सोडून त्यांना मदत कर...
     
 - असं किती महिलांनी मुलांना विश्वासात घेऊन सांगितलं?
नसेल तर आता सुरूवात करायला हवी.. अर्थात पुरूषांनीही
हा ही एक वैश्वीक संस्कार आहे, तो करूया.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/